लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर१. सशस्त्र क्रांतीवादी आणि वेगळ्या वाटेवरची सामाजिक
मांडणी करणारी नाटके : वि. दा. सावरकर -
सं. उःशाप, सं. संन्यस्त खङ्ग, सं. उत्तरक्रिया ३९३
२. धर्मपरिवर्तन, हिंदुमुसलमान प्रश्न यांची सामाजिक मांडणी करणारी
... नाटके : श्रीशंकराचार्य कूर्तकोटी - गंगासंमती अथवा हिंदूकरण
मान्यता! द. ग. सारोळकर - सं. जनताजनार्दन ४१२
राष्ट्रीय राजकारणात आणि मराठी नाटकात १९२० च्या दशकात टिळक ते गांधी असा प्रवास होऊन १९२३ च्या आसपास ते पूर्णतः गांधीमय आणि सत्य, अहिंसा या गांधीवादी तत्त्वांचा पाठपुरावा करणारं कसं झालं होतं ते आपण पाहिलंच.
पण बंगाल आणि महाराष्ट्र हे दोन प्रांत पूर्णतः गांधीमय कधीच झाले नाहीत. दोन्हीकडे सशस्त्र क्रांतिवादी मंडळी होती. आज या सशस्त्र क्रांतिवादाच्या वारशाचा फारसा उल्लेखही महाराष्ट्रात होत नाही. संपूर्ण भारताप्रमाणेच महाराष्ट्रही स्वातंत्र्यानंतर का होईना पण कॉंग्रेसमय झाला, किंबहुना कॉंग्रेसचा बालेकिल्लाच झाला, हे एक कारण. दुसरं म्हणजे, सशस्त्र क्रांतिवाद दोन्हीकडे असला तरी एक महत्त्वाचा फरक होता. तो म्हणजे १९२० नंतर बंगाल डाव्या अंगानं गेला तर महाराष्ट्र बहुतांशी हिंदुत्वाकडे झुकणार्या उजव्या विचारसरणीकडे. कदाचित या फरकामुळेही आजही बंगालमधील पुरोगामी या सशस्त्र लढ्याच्या स्मृती आदराने वागवतात-मग तो कम्युनिस्टांचा असो वा सुभाषबाबूंचा असो वा इतर क्रांतिकारकांचा. महाराष्ट्रात मात्र पुरोगाम्यांची गोची होताना दिसते. तर आता या प्रवाहातल्या नाटकांकडे वळू. महत्त्वाचं म्हणजे याही प्रवाहात बरीच नाटकं आली. सावरकर हे त्या प्रवाहाच्या प्रमुख अध्वर्यूंपैकी एक. आणि ते काही फक्त नाटकांत नव्हे तर वास्तवातही एक जहाल क्रांतिकारक नेते होते. सावरकर हे एक व्यामिश्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची विज्ञानदृष्टी, जहाल राष्ट्रभक्ती, हिंदुसमाजांतर्गत परिवर्तन करण्याची इच्छा एकीकडे आणि विद्वेषाचे व तिरस्काराचे - विशेषतः मुसलमानविरोधी असे - हिंदुत्वाचे राजकारण आणि फॅसिस्ट विचार दुसरीकडे, यात म्हटलं तर संगती आहे म्हटलं तर विरोधाभास.
***
आपल्या पुढच्या नाटकात सावरकर जातीयतेचा प्रश्नही सोडून देऊन आपल्या राजकीय विचारप्रणालीची जास्त थेट मांडणी करतात. नाटकाचं नावही लक्षणीय आहे. ते आहे - ‘संन्यस्त खड्ग’.
हे नाटक १९३१ चं. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडानंतर (१९१४) १४ वर्षांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर (१९२५) ६ वर्षांनी, आणि वरेरकरांच्या गांधीवादी ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकानंतर ९ वर्षांनी आलेलं. १९३० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत गांधीवाद भारतभर प्रमुख ‘वाद’ झाला होता. कॉंग्रेस एकंदरीने गांधींनी आखलेल्या मार्गावरून जाऊ लागली होती.
‘संन्यस्त खड्ग’ या नाटकाचा संपूर्ण रोख गांधीवादी अहिंसेच्या मर्यादा - सावरकरांच्या मते- व आपल्या शस्त्रवादाची अटळता मांडणे हाच आहे. यात ‘उःशाप’ प्रमाणे उपहास नाही. यात सरळ सरळ-पानेच्या पाने- चर्चा आहे. तीही गौतमबुद्धाबरोबर एका सरसेनापतीनं केलेली. या आपल्या हेतूच्या पूर्तीसाठी सावरकरांनी केलेली या जोडीची योजनाच मुळात फार इंटरेस्टिंग आहे.
नाटकाची सुरुवातच सावरकर कशाच्याही ‘अतिरेकाने’ काय होते हे एका पदातून सांगून करतात. ते पद असं-
किती तरि सुललित सहज-गीति|
तार न बहु ताणी॥
ताणीशि तनु बीन तुटे
शिथिल तरी गीति नुठे
अति ते ते करिती हानी॥
आणि अर्थातच हा अतिरेक म्हणजे अहिंसेचा अतिरेक. अहिंसा हे तत्त्व म्हणून ठीक आहे. ज्यावेळी सर्व जगच सत्शील होईल व बुद्धाचा अहिंसक मार्ग अनुसरेल तो दिवस उत्तमच. पण तोवर, जोपर्यंत दुष्ट मनुष्ये भूतलावर आहेत तोपर्यंत, शस्त्रमार्गाला पर्याय नाही. थोडक्यात सांगायचं तर हा सावरकरी निष्कर्ष आहे. नाटकाच्या कथेतून अर्थातच हे तात्पर्य निघतं. नाटकातील चर्चा ‘उःशाप’ पेक्षा निश्चितपणे अधिक खोलात जाते. ‘लोकमान्यांच्या गीतारहस्यातील विचारमंथनाचा आधारही काही प्रमाणात त्याला आहे.’७ हा सर्व वाद तसा सार्वकालिक आहे. निरनिराळ्या लढ्यांमध्ये त्याच्या दोन्ही बाजू मांडल्या जातातच.
या नाटकाच्या सुरुवातीलाच शाक्यांचा सेनापती व बुद्ध यांच्यात प्रदीर्घ चर्चा होते. चर्चेचा शेवट म्हणून शाक्यांचा सेनापती-विक्रमसिंह आपली शंका मांडून - संन्यासधर्म स्वीकारतो.