गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ७


लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर

१. खाडिलकरांची दुसर्‍या टप्प्यावरची नाटके :
सं. मानापमान, सं. द्रौपदी, सं. मेनका २७१
२. नाटकांवरील बंदी २८४
... ३. मेळे व सत्यशोधकी जलसे २९२
४. काही इतर सामाजिक राजकीय नाटके व ऐतिहासिक नाटकांसंबंधी
चर्चा : न. चिं. केळकर - तोतयाचे बंड, गोविंदराव टेंबे -
सं. पटवर्धन, कृष्णाजी हरी दीक्षित - राजा सत्त्वधीर ३००


१९०८ नंतरचा कालखंड टिळक तुरुंगात असण्याचा. राष्ट्रीय पक्षाची कामगिरी या कालखंडात एकंदरीने थंडावली. त्यातून खाडिलकरांवर केसरीतून बाहेर पडण्याचा प्रसंग आला. त्याविषयी आपण पाहिलंच.
याची एकत्रित निष्पत्ती म्हणजे खाडिलकरांच्या नाटकातील स्पष्टपणे जाणवतो असा दुसरा टप्पा. संगीत नाटकांचा. या टप्प्यातही खाडिलकरांनी राजकारणाला नाटकातून पूर्ण फाटाच दिला असं झालं नाही. ‘द्रौपदी’, ‘मेनका’ इत्यादी नाटकांत खाडिलकर परत राजकारणाकडे वळलेच. पण ते पूर्वीसारखे राहिले नाहीत. त्यांची विचारधाराही बदलली, मनोवस्थाही बदलली, आणि स्वाभाविकपणे मांडणीही बदलली. त्याचं प्रत्यंतर आलं ते या टप्प्यावरच्या पहिल्या नाटकातून, ‘संगीत मानापमान’ मधून. ‘मानापमान’ आलं १९११ साली. अनेकदा नुकताच बाटलेला माणूस अधिकच कट्टर धर्माभिमानी असतो त्याप्रमाणे या नाटकात खाडिलकर पूर्णपणे दुसर्‍या टोकाला गेले. ‘मानापमान’मधे राजकीय, सामाजिक जाणिवेचा पूर्णपणे अभाव आहे. नाटकात आहे तो मेलोड्रामा, कृत्रिम घटनाक्रम, कुठल्याही सूत्राचा, वा वैचारिकतेचाच अभाव. त्यात आहेत मध्यमवर्गाला गुंतवणार्‍या तीन गोष्टी - राजकीय संदर्भहीन बाष्कळ विनोद, विरेचन व्हावे इतपत सामाजिकता आणि संगीत. ते गाणारे संगीताचे बादशहा बालगंधर्व खाडिलकरांच्या या आणि यापुढच्या नाटकांना लाभले. हा म्हणजे मनोरंजनाचा कडेलोटच! या नाटकानं बालगंधर्वांचं नातं खाडिलकरांशी जुळलं ते कायमसाठी.

‘मानापमान’ हे नाटक आलं ते त्यांच्या केसरीतल्या झालेल्या अपमानानंतर लगेचच. अपमानानं होरपळेल्या खाडिलकरांचे त्यानंतरचे उद्गार आपण आधीच पाहिले. त्यामुळे त्यांची त्यावेळची मानसिक अवस्था कळू शकते. पोटापोण्याच्या व्यवस्थेपासूनचे त्यांच्यासमोर उभे असलेले प्रश्नही ध्यानात येतात. खाडिलकर त्या कारणानेही - म्हणजे पोटापाण्याचा एक व्यवसाय म्हणून - नाटक या माध्यमाकडे बघू लागले. एकापरीनं ही खाडिलकरांनी घेतलेली यशस्वी माघार. मराठी नाटकाने यापुढे वेगळी दिशा घेतली आणि तिचा मुख्य उद्देश मनोरंजन हा झाला. शनवार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे, संगीत नाटकाच्या या तबकात एकीचे बळ दाखवणारी किंवा बेकीचा बळी दाखवणारी सुरी नाही. इथे आहेत निरांजने.

‘मानापमान’अर्थातच प्रचंड लोकप्रिय झालं. ‘सौभद्र’, ‘शारदा’ आणि ‘संशयकल्लोळ’ याप्रमाणे अगदी आजही लोकप्रिय असणार्‍या त्या काळच्या काही मोजक्या नाटकांपैकी एक झालं. पण या उरलेल्या तिन्ही नाटकांहूनही ते अधिक भडक - मेलोड्रॅमॅटिक, कृतकतेनं भरलेलं असं आहे. संगीताप्रमाणेच या नाटकापासून ‘विनोद’ यावरही मराठी नाटकातला भर वाढला.
नाटकाचं कथानक अगदी साधं आहे. श्रीमंत बापाची श्रीमंत मुलगी भामिनी, तिच्याशी लग्नोत्सुक श्रीमंत पण मूर्ख, भित्रट, बावळट, आढ्यताखोर मुलगा लक्ष्मीधर. मुलीलाही श्रीमंतीचा चांगलाच तोरा आहे. पण तिचा श्रीमंत बाप फार ‘चांगला’. तो तिचे लग्न लावून देऊ इच्छितो धैर्यधर या सैन्यातल्या सेनापतीशी, जो गरीब आहे. (कुठले सैन्य, कुठला सेनापती, हा काळ कुठला, सेनापती गरीब का आहे, श्रीमंत बाप अचानक मनानं चांगला का आहे, तो कुठल्या मार्गानं श्रीमंत झाला, तो मार्ग पिळवणूकविरहित आहे काय, असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण मग नाटक संपेपर्यंत असे असंख्य प्रश्न पडतील. ही तर सुरुवात आहे.) मुलगी नकार देते. बाप म्हणतो तू त्याच्याकडे एक महिना नोकर म्हणून राहून परीक्षा घे! मुलगी मान्य करते! दरम्यान लक्ष्मीधर चोरांना घेऊन जंगलात येण्याचे नाटक वगैरे करतो व बावळटपणे स्वतःच पकडला जातो. भामिनीचे क्षणात मतपरिवर्तन होते. मग गैरसमजाचे अजून दोनचार वेढे घेऊन गरीब मुलगा व श्रीमंत मुलीचे लग्न! पात्रे खूश. धडधाकट गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती यांचा आल्हाददायक, स्वतःला जबाबदारीतून मुक्त करणारा अनुभव आल्याने, मध्यमवर्गीय प्रेक्षक खूश!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा