बुधवार, १४ डिसेंबर, २०११

दृष्टीहीनही वाचणार नाटके!

दृष्टी नसलेल्यांनाही अभिजात नाटकांचा वाचनाच्या साह्याने आस्वाद घेता यावा, या हेतूने नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी तेरा नाटकांना ब्रेल लिपीमध्ये रुपांतरित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील पहिल्या पाच नाटकांच्या रुपांतराचे प्रकाशन आज पुण्यात ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे, त्यानिमित्ताने...

नाटक असो किंवा माहितीपट वेगवेगळ्या माध्यमांतून सतत काही ना काही काम करत असलेले सर्जनशील रंगकर्मी म्हणजे अतुल पेठे. सामाजिक जाणिवेतून आणि कार्यकर्त्याच्या वृत्तीने त्यांनी आतापर्यंत 'कचराकोंडी', 'गावगुंफण', 'स्पेशल इकॉनॉमिक झोन' असे माहितीपट केले, तर काही गावांमध्ये जाऊन तेथील कलाकारांना सोबत घेऊन नाटके केली. त्यांच्या या उपक्रमांचाच पुढचा भाग म्हणजे अंधांनाही अभिजात नाटकांचा आस्वाद घेता यावा, म्हणून ती ब्रेल लिपीत रुपांतरित करणे.

ब्रेल लिपीत नाटकांचे रुपांतर करण्यामागील त्यांचा विचार आणि भूमिका नोंद घेण्यासारखी आहे. 'दलपतसिंग येती गावा' या त्यांच्या नाटकात एक अंध कलाकार होता. उत्तम वाद्ये वाजवणा-या त्या कलाकाराचे अचानक निधन झाले. त्याला नाटक आणि त्याची प्रक्रिया समजावताना, एकूणच अंधांना नाटक या माध्यमाचा किमान वाचून तरी कसा अनुभव घेता येईल, या विचाराने पेठे यांना झपाटून टाकले. त्यातून ब्रेल लिपीचा पर्याय पुढे आला. ब्रेल लिपीतून दृष्टीहीनांना कथा, कादंबऱ्या उपलब्ध होत असल्या, तरी नाटके मिळत नाहीत. त्यामुळे मराठीतील तेरा अभिजात आणि वाचनीय नाटके ब्रेल लिपीत रुपांतरित करण्याचे त्यांनी ठरविले. या नाटकांची निवड करताना मुख्यत्वेकरून त्या नाटकांमधील भाषा, त्यातील विषयांची हाताळणी, नाट्यमयता यांचा विचार केला. वाचून अनुभवता येऊ शकतील अशाच नाटकांची निवड त्यांनी केली.

पहिल्या टप्प्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचे 'तृतीय रत्न', गोविंद बल्लाळ देवल यांचे 'संगीत शारदा', राम गणेश गडकरी यांचे 'एकच प्याला', दिवाकरांच्या नाट्यछटा आणि दि. बा. मोकाशी यांच्या 'आनंद ओवरी' या नाटकांचा समावेश आहे. ही नाटके ब्रेल लिपीतून सीडीवर उपलब्ध केली असून, ज्यांच्या घरी ब्रेल प्रिंटर आहे, ते घरच्या घरी प्रिंट करून वाचू शकतील. या प्रकल्पासाठी सरोज शेळे, फुलोरा प्रकाशन, कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन, सुरेंद्र रानडे आणि कुमार गोखले यांची मोलाची मदत झाल्याचेही पेठे आवर्जून नमूद करतात.
पुढील टप्प्यात आचार्य अत्रे यांचे 'साष्टांग नमस्कार', वसंत कानेटकर यांचे 'रायगडला जेव्हा जाग येते', विजय तेंडुलकर यांचे 'अशी पाखरे येती', जयवंत दळवी यांचे 'संध्याछाया', महेश एलकुंचवार यांचे 'वाडा चिरेबंदी', गो. पु. देशपांडे यांचे 'सत्यशोधक' आणि सतीश आळेकर यांच्या दोन एकांकिका ब्रेल लिपीतून दृष्टीहीनांना उपलब्ध होणार आहेत.

नाटक किंवा इतर माध्यमांचा समाजासाठी वापर करण्याबद्दल पेठे म्हणतात, 'सध्या आजूबाजूला जे काही घडत आहे, त्यात माणूस म्हणून आणि कलाकार म्हणूनही वेगळं किंवा दूर राहाणं अशक्य आहे. त्या घुसळणीतून निर्माण होणा-या प्रश्नांचे अन्वयार्थ कलाकार म्हणून लावावेत असं मला वाटतं. या प्रश्नांपोटी सामाजिक-राजकीय व्यक्तींना भेटून माझी समज वाढवण्याचा मी प्रयत्न केला. शिवाय महत्त्वाची गोष्ट, नाटक नावाचं माध्यम आपल्या नेहमीच्या चौकटीबाहेर नेणं, त्याचा परीघ वाढवणं मला आवश्यक वाटलं. ते वेगवेगळ्या क्षेत्रांना भिडवणं गरजेचं वाटलं आणि त्याच गरजेपोटी वेगवेगळे प्रयोग करून पाहावेसे वाटले. आरोग्य या संकल्पनेत नाटक या माध्यमाचं काय योगदान असेल याचा विचार केला आणि 'आरोग्य संवाद' नावाची संकल्पना अनेक डॉक्टर्सच्या सहकार्याने जन्माला आली.
'वेगवेगळ्या गावांमध्ये नाट्यकार्यशाळा घेतल्या. त्या त्या ठिकाणचे प्रश्न समजावून घेणं, नव्या कलावंतांसाठी नवनिमिर्ती करणं, स्थानिक कलाकारांना पोषक वातावरण निर्माण करणं याबरोबरच त्यांची मनोभूमिका आणि व्यक्तिमत्व विकास करण्याचाही प्रयत्न केला. यात कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानबरोबर दिवाकरांच्या नाट्यछटांवर बेतलेलं 'मी माझ्याशी' व राजकुमार तांगडे यांच्याबरोबर जांबसमर्थ इथे 'दलपतसिंग येती गावा' ही नाटकं केली. माहिती अधिकार कायदा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हे नाटक भाष्य करतं. केवळ नाटक नाही, इतर कलांचाही आस्वाद घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने मी करतो. नुसतं नाटक करून भागत नाही, ते लोकाभिमुख व्हावं हा माझा हेतू असतो. म्हणून जास्तीत जास्त प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यापैकी 'मी माझ्याशी' हे नाटक दिल्लीच्या 'भारत रंग महोत्सवा'तही सादर झालं होतं.'

या सगळ्या प्रयोगांतून नवा प्रेक्षक निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम पेठे करतात. नाटकाशी निगडित प्रयोग किंवा इतर प्रयोगांतूनही स्वत:च्या सर्जनशीलतेला वाव मिळतो, आपल्यातील कलाकार अधिक खुलतो, असे त्यांना वाटते. आजूबाजूच्या वातावरणात समरसून जाण्यासाठी ही माध्यमे त्यांना अधिक आपलीशी वाटतात आणि म्हणूनच ते त्यांचा वापर करतात. दृष्टीहीनांना किंवा समाजातील इतर गटांनाही नाटकासारख्या माध्यमांची नक्कीच आवश्यकता असते, असे त्यांना वाटते. 'दृष्टीहीन, विशेष लोक, कामगार वर्ग हे गट आपल्याच समाजाचा एक भाग आहेत हे विसरलं जातं आहे, ही दुदैर्वाची बाब आहे. त्यामुळे या वंचित, पीडित समाजाकडे माणूस म्हणून लक्ष देणं मला आवश्यक वाटतं. या लोकांमध्येही कला असते आणि तिला व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. दृष्टीहीनांना ब्रेल लिपीत नाटकं उपलब्ध करून देणं हा त्याचाच एक भाग आहे. कारण त्यांनाही वाचनात रस असतो. ग्रामीण भागाबरोबरच हा गटही नाटकात सामावून घेतला पाहिजे,' असे पेठे म्हणतात.

--चिन्मय पाटणकर
मूळ दुवा.

ब्रेल प्रिंटर उपलब्ध असेल आणि ही ब्रेल लिपीत प्रसिद्ध केलेली नाटके तुम्हाला हवी असल्यास, या post वर ’प्रतिक्रिया’तून तुमचा email पत्ता कळवा. तुमची माहिती इथे प्रसिद्ध केली जाणार नाही. कलातर्फे ही नाटके तुम्हाला email द्वारे उपलब्ध होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा