गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ६

 
लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर

१. पुढच्या टप्प्यावरील राजकीय नाटके :
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर - प्रास्ताविक २३१
२. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर :
... सवाई माधवराव यांचा मृत्यू, कीचकवध, भाऊबंदकी २३६
३. दुसर्‍या टप्प्यावरची सांस्कृतिक राष्ट्रवादी नाटके :
दामोदर विश्वनाथ नेवाळकर - तारक मारक, दंडधारी, धर्मरहस्य २५५


तर शेवटी आपण या राजकीय नाटकांचा सुवर्णकाळ असं ज्याचं वर्णन करतात त्या कालखंडातल्या सर्वोच्च बिंदूपर्यंत, म्हणजे खाडिलकरांपर्यंत एकदाचं येऊन पोचलो. आता खरी मजा. खाडिलकरांची नाटकं म्हणजे राजकीय वैचारिक प्रगल्भता, तसंच तोपर्यंत वाढत गेलेल्या कलात्मक उंचीचा वारसा - यांचा संगम.
खाडिलकरांचा जन्मही सांगलीचाच! हा मोठाच योगायोग आहे. याची सामाजिक, राजकीय कारणमीमांसा वगैरे करण्याचा मी मरेस्तोवर प्रयत्न केला. पण काहीही हाताशी आलं नाही! तेव्हा हा मोठाच योगायोग असं म्हणून मोकळं व्हावं हे बरं.

या काळातले सर्वच नाटककार टिळकभक्त होते हे आपण पाहिलंच. पण खाडिलकर राजकीय कार्यकर्ता म्हणूनही आणि पत्रकार, सहकारी म्हणूनही टिळकांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातले होते. कर्झनशाहीच्या जुलमाच्या पराकोटीच्या काळात टिळकांनी त्यांना शस्त्रनिर्मितीचा अभ्यास करण्यासाठी नेपाळला पाठवलं होतं, असं म्हणतात. हे ब्रिटिशांना उशिरानी कळलं. पण त्यानंतर ब्रिटिश पोलिसांची खाडिलकरांवर विशेष नजर असे, अशा नोंदी ब्रिटिश पोलिसांच्या फायलीत आढळतात. त्यांच्या नाटकावरही ब्रिटिश विशेष लक्ष ठेऊन असत आणि त्यावर त्यांनी बंदीही आणलीच. ते आपण पुढे बघूच.

केसरीचे उपसंपादक म्हणूनही खाडिलकर अत्यंत जहाल वसाहतवादविरोधी ‘संपादकीय’ लेख लिहीत. किंबहुना टिळकांना १९०६ साली राजद्रोहासाठी ६ वर्षे काळ्यापाण्याची भीषण शिक्षा ज्या आठ लेखांमुळे झाली, त्या लेखांपैकी पाच लेख प्रत्यक्षात खाडिलकरांनी लिहिले होते. टिळकांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून ही शिक्षा पत्करली! आज पटकन् माफी मागणारे लेखक व संपादक पाहता - पण ते जाऊ द्या.

खाडिलकरांची नाटकं किती प्रभावी होती ते कळण्यासाठी एका घटनेचा उल्लेख करणं आवश्यक आहे. इंडियन प्रेस ऍक्ट हा सेन्सॉरविषयक कायदा केला जावा असं अनेक ब्रिटिश अधिकार्‍याचं मत होतं. पण जॉन मोर्लेनी त्यांच्या उदारमतवादी विचारसरणीला जागून तो बराच काळ होऊ दिला नव्हता. हा इंडियन प्रेस ऍक्ट शेवटी १९१० मध्ये पास झाला. आणि त्यामागे ‘कीचकवध’ या खाडिलकरांच्या नाटकाशी संबंधित अशा घटना होत्या. ते आपण अधिक डिटेलवारीनं नंतर पाहणारच आहोत. यानंतर ब्रिटिश सरकार हात धुऊन वर्तमानपत्रांच्या मागे लागलं आणि आपण हजर नसताना केसरी चालू तरी राहावा म्हणून टिळकांनी तुरुंगातून त्याची सूत्रं जहाल खाडिलकरांऐवजी मवाळ केळकरांकडे सोपवली, ही आयरनी!
खाडिलकरांनी नाट्यव्यवहार हा राष्ट्रवादी चळवळीचा अविभाज्य भागच बनवला. ...केतकरी कादंबरीत जी वैचारिक उंची, रूपबंधात्मक प्रयोगशीलता दृष्टीस पडते, ती प्रथम खाडिलकरी नाटकात दृष्टीस पडते. खाडिलकर पत्रकार होते, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसेनानी होते. उपनिषदांचे अभ्यासू समीक्षक होते. त्यामुळे खाडिलकरी नाटकात एका जीवनदृष्टीची साक्ष पटते... भाऊबंदकी आणि कीचकवधासारख्या गोष्टी एरवी नुसत्या आख्यान होऊन उरल्या असत्या. खाडिलकरी नाटकांत या गोष्टींना समकालीन राजकीय अर्थ प्राप्त होतात, आख्यान परंपरेचा इतका समर्थ आणि समकालीन माहात्म्य असलेला उपयोग फार थोडे लेखक करू शकतात... नाटकाद्वारे लेखकाला एक विचार प्रसारित करता येतो व ते त्याने केले पाहिजे, अशी भूमिका असणारे खाडिलकर पहिले भारतीय नाटककार असावेत. पहिले ‘डायडॅक्टिक’ नाटककार असेही म्हणता येईल.

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ५

 
लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर

1.राजकीय नाटकांची सुरुवात : शंकर मोरो रानडे ‘अधिकारदान विवेचना अथवा स्थानिक स्वराज्याविषयी वाटाघाट’ २०९
२. वा. र. शिरवळकर - राणा भीवदेव अथवा खरा रजपूत,
भा. ह. पटवर्धन - रणसिंह आणि बकुळा अथवा प्राचीन राजक्रांतीचे चित्र २१६
... ३. टिळक व मराठी नाटक २२३


‘अधिकारदान विवेचना अथवा स्थानिक स्वराज्याविषयी वाटाघाट’ या नाटकाच्या अगदी पहिल्याच पानावर एक पद आहे. तसं ते नाट्यबाह्यच आहे खरंतर. अशी पद्धतच होती. लेखक आपल्याला काय म्हणायचं आहे ते कधीकधी अशा पद्धतीनं स्पष्टच करून टाकत असे. ‘तरुणी शिक्षण नाटिका’ मधे नाही का आपण महाभारत आणि मनुस्मृतीतले उतारे दिलेले पाहिले, तसंच हे, पद पाहण्यासारखं आहे. -

‘‘कशास व्हावे जीवन मनुजा स्वातंत्र्यभावी?
आयुष्याची व्यर्थ क्रमणा श्रमद आदरावी?॥
विश्व असे हा तुरुंग मोठा, प्राणीमात्र कैदी!
पदार्थधर्माचीया शृंखला- त्या व कुणी भेदी!
तरी अन्यमानवेच्छेपुढे करणे नमनादि-
याहुन दुसरी जिवन्तकारस्थिती नचि वर्णावी!

दुसरं महत्त्वाचं म्हणजे, या काळातील जवळ जवळ प्रत्येक नाटकाला प्रस्तावना असे. एका प्रकारे तो लेखकाचा मॅनिफेस्टोच, जाहीरनामाच असे. काही सामाजिक, राजकीय भूमिका असणार्‍यांना तो अनेकदा आवश्यक वाटतो. याबाबत स्वातंत्र्यानंतरच्या मध्यमवर्गीय नाटकासंबंधात काय स्थिती आढळते ते बघण्यासारखं आहे. या काळातल्या गो. पुं. देशपांडे यांच्या जवळजवळ सगळ्याच आणि तेंडुलकरांच्या सुरुवातीच्या काही नाटकांचा अपवाद वगळता प्रस्तावना अभावानंच आढळतात. यामागची कारणं उघड आहेत. या काळातल्या इतर लेखकांना सामाजिक, राजकीयदृष्ट्या आपला मॅनिफेस्टो काढावासा वाटत नाही. हे चांगलं का वाईट का व्यामिश्र ते आपण तिथंपर्यंत आल्यावर बघूच. सध्या याची नोंद मात्र घेऊन ठेवू.

तर परत ‘अधिकारदान विवेचना’. या नाटकाच्या प्रस्तावनेत लेखक म्हणतो- ‘स्थानिक स्वराज्यासंबंधाने वर्तमानपत्रातून लेख सांप्रत जारीने प्रसिद्ध होत आहेत... हे नाटक लिहिण्याचा आमचा हेतू एवढाच की महत्त्वाच्या विषयाचे स्वरूप, आमच्या बंधूजनांस करमणुकीच्या वाटेने राहून कळावे, व त्यायोगे आजचा प्रसंग केवढा आणीबाणीचा आहे हे त्यांस पुरतेपणी कळून त्यांनी स्थानिक स्वराज्यसंबंधाची योग्यता आपल्या अंगी आणण्यास यथाशक्ति झटण्यास आळस करू नये....

‘...उत्तम नाटके योग्य पात्रांकरवी रंगभूमीवर करण्यात आली असता ती ज्याप्रमाणे देशस्थिती सुधारण्यास हेतुभूत होऊ शकतात, त्याचप्रमाणे रसाळ हरिदासांकडून सुबोधपर कीर्तने करण्यात आली असता तीही देशस्थिती सुधारण्यास कारणीभूत होतात. यासाठी प्रस्तुत नाटकात शेवटल्या प्रवेशात प्रत्यक्ष रंगभूमीवर देशस्थिती संबंधाचे कीर्तन घालण्यात आले आहे....’

प्रस्तावना वाचली की आपण आधी पाहिल्याप्रमाणे या काळी हाय कल्चर, लो कल्चर किंवा उच्चभ्रू संस्कृती आणि लोकसंस्कृती यांत भेद किती कमी होता ते परत जाणवतं. तसंच मराठी नाटक केवळ परकीय, ब्रिटिश शैलीवर अवलंबून नव्हतं तर लोककलांचा जागरूक वापरही त्यात किती होत असे तेही जाणवतं. टिळकांनी पुढे ‘राष्ट्रीय कीर्तनाचा’ जो पुरस्कार केला त्याची बीजं यात आहेत.

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ४


लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर

अनुक्रमणिका
१. दुसरा कालखंड, १८८० ते १९३० - प्रास्ताविक १३३
२. संगीत रंगभूमीची सुरुवात
अण्णासाहेब किर्लोस्कर - सं. शाकुंतल व सं. सौभद्र १४२
... ३. सुरुवातीची सनातनी व सांस्कृतिक राष्ट्रवादी गद्य नाटके
नारायण बापूजी कानिटकर - तरुणी शिक्षण नाटिका १६०
४. नारायण बापूजी कानिटकर - सम्मतीवयाचा कायदा १८३
५. सुधारकी सामाजिक नाटके : गोविंद बल्लाळ देवल - सं. शारदा १९२

ही चौथी रात्र होती. आता आम्ही प्रवेश करणार होतो त्या काळाला मराठी नाटकाचा सुवर्णकाळ वगैरे म्हणतात. तेव्हा आता मोठीच मौज येणार होती. मी सांगायला लागलो-
तर साल १८८०. तेथून, म्हणजे त्याच्या आसपास, या कालखंडाची सुरुवात मानायला हरकत नाही. कोणास ती चारदोन वर्षं इकडेतिकडे वाटत असल्यास त्याने तसं मानण्यास आमची यत्किंचितही हरकत नाही.

तर १८८० नंतर सुरुवातीला युग येणार होतं ते नाट्यतंत्रातल्या आणि कलात्मक सुधारणेचं. आता नाटकाचं केंद्र पुणे, मुंबईत स्थिरावलं. रंगभूमी अर्थातच ब्राह्मणी, पुरुषी, नागर, मध्यमवर्गाच्याच ताब्यात होती. तशी ती आजतागायत काही अपवाद वगळता आहेच. इंग्रजी वाङ्मयावर पोसलेलं या वर्गाचं मन आधी कलात्मकतेकडे, त्याच्या सफाईदारपणाकडे- refinement कडे- वळलं. वास्तविक जीवनातल्या राजकारणात, १८८० पावेतो वसाहतिक राजवटीचं स्वरूप अभिजनांच्या लक्षात येऊ लागलं होतं. आता केवळ ‘आपली सत्ता गेली यावरचा राग’, यापुरतं ते मर्यादित नव्हतं, तर साम्राज्यवादी सत्ता ही व्याख्येनेच पिळवणूक करणारी असते, याचं थोडं भान येऊ लागलं होतं. इंग्रजी शिक्षणातून निव्वळ आधुनिक ज्ञानाबद्दल अचंबा आणि त्यांचं अनुकरण वा अंधानुकरण एकीकडे किंवा सनातनी वृत्तीनं हे ज्ञानच नाकारणं दुसरीकडे, या दोन सुरुवातीच्या प्रतिक्रीयांच्या पलीकडे जाऊन, या ज्ञानातूनच तत्कालीन जगाला भिडू शकेल अशी जीवनदृष्टी तयार होऊ लागली होती. पण संपूर्ण स्वातंत्र्यासाठीची चळवळ अजून बरीच लांब होती. कॉंग्रेसची स्थापना व्हायलाही पाच वर्षं बाकी होती, कॉंग्रेसनं स्वातंत्र्याच्या मागणीकडे वळायला तर बराच अवकाश होता. पण अर्ध्यामुर्ध्या स्वातंत्र्यासाठीची चळवळ किंवा त्या बाबतीतली जाणीव मात्र तीव्र होऊ लागली होती. त्याचे पडसाद नाटकात उमटायलाही काही काळातच सुरुवात झाली. कलात्मक ढोबळता गेली तशी तात्त्विक ढोबळताही कमी होऊ लागली.
***

‘सं. शाकुंतल’ आणि ‘सं. सौभद्र’ या दोन नाटकांना एकत्र घेण्याचं कारण असं की त्यांच्या मागची जीवनदृष्टी एकच आहे. दोन्हींच्या आशयवस्तूत सामाजिक, राजकीय संघर्ष नसूनही आपल्यासाठी ती महत्त्वाची आहेत. या काळातली नाटकं प्रखरपणे राजकीय होती असं आपण म्हटलं, पण या कालखंडाची सुरुवात झाली ती कलात्मक मांडणी प्रगल्भ आणि सफाईदार होण्यातून. तसा या नाटकांचाही विषय पौराणिकच आहे. आणि आधीच्या नाटकांच्या अस्तित्वामागची सामाजिकता/राजकारण यांचा अर्थ जसा लावता येतो तसाच किर्लोस्करी नाटकांची मांडणी तपासली, व्यवहार तपासला तर त्यांचाही लावता येतो. आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचं.

आपण म्हटलं की १८८० पर्यंत नाटक हळूहळू पुणे मुंबईत केंद्रित होऊ लागलं होतं. किर्लोस्करांचा जन्मही धारवाडचाच, पण त्यांनी नाटक केलं पुण्यात येऊन. ‘शाकुंतल’ नाटक आलं १८८० साली आणि ‘सौभद्र’ आलं १८८२ साली. या नाटकांद्वारे वरच्या वर्गाचं/वर्णाचं नाटक कलात्मक प्रगल्भतेच्या पुढच्या पातळीला पोचले. एका अर्थी अभिजात - classical - झालं. भाषासौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहजसोपे स्वाभाविक संवाद, सगळ्याच बाबींत या नाटकांनी पुढचा पल्ला गाठत एक मापदंडच- बेंच मार्कच- तयार केला. पण त्यातही सर्वांत अधिक महत्त्वाचं म्हणजे त्यातला संगीताचा वापर.

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ३




लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर

अनुक्रमणिका
१. फार्स प्रस्तावना १०७
२. ना. ह. भागवत - मोर एल. एल. बी. प्रहसन ११९
३. पहिला कालखंड, १९४३ ते १९८० - उपसंहार १२९

फार्स प्रस्तावना

तिसर्‍या रात्री मी टेकडीवर गेलो तेव्हा लेखक आलेलाच असेल अशी माझी खात्री होती. आणि तो नव्हता. मला काल रात्रीपासूनच एकटं वाटत होतं. आणि ज्याच्याशी संपर्क आल्यानं ते तसं वाटायला लागलं होतं तोही गायब होता. मी अत्यंत अस्वस्थपणे बसून राहिलो. मधेच मला त्याचा राग येत होता आणि मधेच त्याची काळजी वाटत होती.
वेताळासमोर कोणीतरी कोंबडी कापून टाकली होती. त्या जागच्या रक्ताचं थारोळं आता थिजलं होतं, पण शेजारी, खांबाच्या आडोशानं लावलेली मोठी मेणबत्ती मात्र जळत होती. त्याकडे परत परत लक्ष वेधून घेत होती. हे करणारी लोकं कोण? मी इथे बसून नाटकाच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासासंबंधी गेल्या तीन रात्री तारे तोडतोय त्याचा यांच्याशी काय संबंध? माझा यांच्याशी काय संबंध? माझा या देशातल्या बहुसंख्यांशी काय संबंध? एकवेळ हेतूंच्या बाबतीत मी त्यांच्याशी काही एकरूपता दाखवू शकेन. पण व्यापक जगाला भिडून माझी जी जीवनदृष्टी तयार झाली आहे, माझ्या ज्या कलात्मक जाणिवा तयार झाल्या आहेत त्यांचं मी काय करू? कोणी आणि का केलं मला आधुनिक वगैरे? आणि हा तुटकपणा आज केवळ दोन गटांतला नाही. तो ठिकर्‍या ठिकर्‍या करणारा आहे. आण्विकीकरण - ऍटमाइझ करणारा आहे. मग ‘मी कोण’चा अर्थ काय?
***
मी बोलायला लागल्यावर लेखकाचा मूडही उत्साही झाला. त्यामुळे मधे न बोलण्याचा आमचा करार विसरून तो म्हणाला, फार्स? पहिल्या दिवसापासून मला हेच विचारायचंय की, फार्सचा अभ्यास तो काय करायचा?
मी म्हणालो, अरे बाबा काहींच्या मते तीच खरी पहिली आधुनिक मराठी नाटकं. कारण ती सामाजिक होती. त्यांना लिखित संहिता होत्या, संवाद होते, पात्रं होती, ती बंदिस्त रंगभूमीवर प्रोसेनियमच्या चौकटीत होत असत, तिकिटं लावून होत असत. थोडक्यात आधुनिक नाटकाला लागतं ते सगळं त्यांत होतं. तेव्हा त्यांना निदान भीमराव कुलकर्णीप्रमाणे आधुनिक मराठी नाटकाची जननी म्हणून किंवा पूर्वसूरी म्हणून तरी मान देण्यावाचून पर्यायच उरत नाही. तेव्हा ऐक.
पहिला फार्स अमरचंद वाडीकर मंडळींनी केला अशी नोंद आहे आणि ती आहे १९ जाने. १८५६ मधली, म्हणजे १८५७च्या बंडाआधी आणि मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेआधी एक वर्ष, आणि फुल्यांच्या ‘तृतीय रत्न’च्या एकच वर्षानंतरची. कीर्तन्यांच्या पहिल्या बुकिश नाटकाच्या सहा वर्षं आधीची. अगदी आधीच्या या फार्सेसच्या संहिता उपलब्ध नाहीत. पण १८८० पासूनच्या १२६ संहिता उपलब्ध आहेत! त्यांची यादीच भीमराव कुलकर्णी यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे.
***
तर, भाव्यांपासून पुढे पौराणिक नाटकं कशी खूप जोरात चालायला लागली, त्यांच्यात अतिरेकी पातळीवर तांत्रिक करामती, राळ उडवणं, राक्षसांची युद्धं, त्यांच्या भयानक आरोळ्या यांवरच कसा भर येऊ लागला आणि त्यामुळे त्यांना अलल्लडुर नाटकं कसं म्हणायला लागले ते आपण पाहिलंच. त्यांच्या जाहिराती पाहिलेल्या आठवतात का? त्यांत या फार्सची पण जाहिरात असायची, आणि ती अशी असायची -
१) नारायणरावाचे पोट फाडून साखरभात व आतडीं हुबेहूब दाखवूं. यांत ४ रस असून शोकरस पूर्ण होईल. फार्स रात्र राहिल्यास चमत्कारिक होईल.
२) बभ्रूवाहनाख्यान व स्त्री चरित्रांतील हास्यकारक एक फार्स होईल.
अशाच एका जाहिरातीत एका फार्सची जाहिरात पुढीलप्रमाणे केली आहेः
३) स्नेह केल्यापासून त्याचा अंती परिणाम, व उत्तम स्त्रीने प्रेतासी श्रृंगार केलेला मनोवेधक फार्स.

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र २


१. पहिली सामाजिक नाटके :रघुनाथ शंकरशास्त्री अभ्यंकर - प्रबोधिक्रया अर्थात स्वैरसकेशा ६३
२. म. बा. चितळे - मनोरमा ७६
... ३. पिहले (भाषांतरित) नाटक : दीनबंधू मित्र/विठ्ठल मोरो वाळवेकर - नीलदर्पण ९२

प्रकरणातील काही भाग-
आपण दुसर्‍या रात्री वेताळटेकडीवर जाऊ तेव्हा लेखक महाराज काही येणार नाहीत, असं धरूनच मी खरंतर टेकडीवर गेलो. पण पाहातो तो काय, लेखक हजर. म्हटलं नाही, मोठी चिवट जात. मी त्याला म्हटलं, अरे वा! माझ्या आधी हजर. काय नवल विशेष? दारूबिरू आहे ना पुरेशी? आणि मॅचचं काय झालं? शेवटचा स्कोअर मला-


तो मला तोडत म्हणाला, ‘स्वैरसकेशा-’ मला काही कळेना. तो जणू माझा उच्छृंखलपणा सहन न झाल्यासारखा वैतागून म्हणाला, स्वैरसकेशा. या नाटकाबद्दल बोलणार होतात. इतर फालतू गोष्टी नकोत. आणि त्यानं बाटली तोंडाला लावली.

मग मी मनात म्हटलं ‘मर’ आणि थेटच विषयाला हात घातला. बहुधा मी काल रात्री इतिहास माहीत नसणं, सकेशा म्हणजे काय ते माहीत नसणं यावरून काही बोललो ते त्याला लागलं असावं. पण तरी तो आला होता. त्याला रस नक्कीच येऊ लागला होता. त्यामुळे मग मी फार विचारण्याच्या फंदात न पडता सरळ सांगायलाच लागलो, ‘स्वैरसकेशा’ या नाटकाचं संपूर्ण नाव, ‘प्रबोधिवद्युत अर्थात स्वैरसकेशा’ नाटिका. ते आलं १८७१ साली आणि त्याचे लेखक होते रघुनाथ शंकरशास्त्री अभ्यंकर. हे मराठीतलं पहिलं सामाजिक नाटक असं अनेक जण मानतात. फुल्यांचं ‘तृतीय रत्न’ लक्षात घेतलं नाही तर ते खरंच आहे. ते काही का असेना, या नाटकापासून एक अत्यंत महत्त्वाचा प्रवाह चालू झाला. तो म्हणजे सामाजिक प्रश्नासंबंधात, त्यातून विशेष करून लिंगभावी राजकीयतेबाबत (gender politics) मांडणी करणार्‍या नाटकांचा.

त्यावेळच्या सामाजिक समस्या होत्या तीन वर्तुळांतल्या. एक जातीय. त्याकडे मराठी उच्चवर्णीय मध्यमवर्गीय रंगभूमी अपवादानंच कधी वळली. दुसरं वर्तुळ होतं धार्मिक सांप्रदायिक संघर्षाचं. त्याकडे मात्र या रंगभूमीनं भरपूर लक्ष दिलं पण ते खूप नंतर. तिसरं वर्तुळ स्त्रीविषयक प्रश्नांचं. त्याकडं मराठी नाटक ‘स्वैरसकेशा’मधून पहिल्यांदा वळलं.
याचं एक कारण असं की, हा विषयच तेव्हा महत्त्वाचा होता. या विषयाचा सखोल अभ्यास आणि चर्चा समाजात चालू होती. त्याही आधी अगदी पेशवाईपासून विशेषतः विधवांच्या प्रश्नावर, थोडे का होईना पण काम झालं आहे, १९३० साली भ्रूणहत्येच्या प्रश्नावर पहिलं पुस्तक आलं होतं, पण रंगभूमी इतर सामाजिक विषयांपेक्षा अधिक प्राथिमकतेनं या प्रश्नांकडे का वळली त्याला इतरही काही महत्त्वाची सामाजिक कारणं आहेत. त्यांतलं एक असं की या मराठी उच्चवर्णीय मध्यमवर्गीय रंगभूमीला जातीयतेविषयी फारसं देणंघेणं नव्हतं, कारण त्या सामाजिक रचनेच्या उतरंडीत हे नाट्यकर्मी वरच्या पायरीवर होते. धार्मिक सांप्रदायिक संघर्ष त्यांच्या जिव्हाळ्याचे, पण ते मुळात उद्भवायला अजून अवकाश होता. मुंबईत पहिला मोठा हिंदू-मुसलमान दंगा झाला तो १८९३ साली.
तत्कालीन स्त्रीविषयक समस्या तीन गोष्टींशी निगडित होत्या. पहिला, बालविवाह आणि त्याचाच उपप्रश्न म्हणजे जरठबाला विवाह; दुसरा, वैधव्य आणि तिसरा स्त्रीशिक्षण. यांतील बालविवाह आणि स्त्रीशिक्षण यांपेक्षा लेखकांचं लक्ष विधवांच्या प्रश्नाकडे आधी वळलं. का? उघड आहे. लेखक पुरुष होते. या प्रश्नाचा संबंध भयानक वाढलेल्या नैतिक भ्रष्टाचाराशी होता. आणि तो स्वार्थाच्या दृष्टीने त्यांना, स्त्रियांवर होणार्‍या अन्यायापेक्षा, स्वाभाविकपणे फार जवळचा होता.

***

'स्वैरसकेशा’ नाटक आलं १८७१ साली. म्हणजे फुल्यांनी विधवांसाठीचा आश्रम काढला त्यानंतर तीन वर्षांनी, आणि विधवा विवाह कायद्यानंतर पंधरा वर्षांनी. नाटक मूलतः विधवांच्या तत्कालीन प्रश्नांची मांडणी करतं. पण त्यामागची जीवनदृष्टी मात्र अत्यंत सनातनी, पुरुषसत्ताक चौकटीतून उद्भवणारी अशी आहे.

हे समाजिचत्र लेखक मांडतो. ते फार भयानक आहे हे सांगतो. विधवांवर होणार्‍या भीषण अन्यायाचं दर्शन घडवतो. या सगळ्यासाठी जबाबदार कोण? पुरुष? छे, पुरुष असे असणारच. जबाबदार आहेत त्या आपलं वैधव्य मान्य करून, सनातनी पद्धतीनं केशवपन करण्याचं नाकारणार्‍या, स्वैर वर्तणूक करणार्‍या आणि पुरुषांच्या अशा वागण्याला खत पाणी घालणार्‍या विधवा. म्हणून तर नाटकाचं नाव ‘स्वैरसकेशा’, ‘स्वैरपुरुष’ नव्हे! आणि यावर उपाय? विधवांनी सनातनी पद्धतीने ‘मर्यादेत’ वागणं.
नाटकातली ही अन्यायाची वर्णनं आणि लेखकानं केलेला नैतिक जबाबदारीचा निर्णय यांत इतका विरोधाभास आहे की कधीकधी लेखकाचा आणि आपला दोघांचाही गोंधळ उडतो! त्याचं उघड कारण म्हणजे लेखकाला विधवांवरचा अन्याय तर स्पष्ट दिसतो आहे, त्याविषयी तो खरोखर मनापासून व्यथित आहे. पण हा अन्याय सनातनी पुरुषसत्ताक पद्धतीतून उद्भवतो हे काही गडी मान्य करायला तयार नाही.

- मकरंद साठे
प्रकाशक: पॉप्युलर

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र १


लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर

रात्र एक
१. झाले ते असे १
२. पहिला कालखंड, १८४३ ते १८८० प्रास्ताविक ९
३. पहिली नाटके - (अ) विष्णुदास भावे - सीता स्वयंवर २५
४. पहिली नाटके - (ब) म. जोतिबा फुले - तृतीय रत्न ३६
५. पहिली नाटके - (क) बुकिश/ऐतिहासिक नाटके,
वि. ज. कीर्तने - थोरले माधवराव पेशवे ४८


रात्र एक
झाले ते असे
मी निघालो होतो वेताळ टेकडीवर. रात्रीची वेळ होती. अकरा साडेअकराची. म्हणजे नाटकाचे प्रयोग संपायला काहीसा अवकाश होता. थंडी संपत आली होती. तरी होती. टेकडीचा पहिला चढ कधीच चढून झाला होता. मधलं पठार संपवून मी दुसर्‍या चढाला लागलो होतो. इथंपासून खालच्या शहराचा आवाज आणि उजेड दोन्हींचा त्रास कमीकमी होत जातो, तसा तो व्हायला लागला होता. या जागी यावेळी फारसं कुणी भेटत नाही. वरच्या चढावावर तर नाहीच. टेकडीच्या पायथ्याशी असणार्‍या वस्तीतले दोनचार दारुडेही खालच्या चढावावर असतात, तेही इथंपर्यंत येत नाहीत. आणि कधी आलेच तर या वेळेपर्यंत टिकतही नाहीत. गेल्या कित्येक वर्षांत मला इथं माझ्यासारखं नित्यनेमानं येणारं कोणी भेटलेलं नाही. तसं म्हटलं तर खूपच वर्षांपूर्वी भालचंद्र नेमाडे नावाचे, मराठी साहित्यात नंतर फार मोठं काम केलेले गृहस्थ भेटायचे. तेव्हा ते तरुण होते. कॉलेजात होते. आणि भेटायचे म्हणजे काय तर दिसायचे. माझ्याकडं त्यांनी ढुंकूनसुद्धा कधी पाहिलं नाही. तेव्हासुद्धा नाही. मरे ना का. नसतो एकेकाला नाटकातल्या विदूषकात इंटरेस्ट. तसा मी अगदी पूर्ण लोकशाहीवादी माणूस आहे.
**********

आता आपण मुद्द्याशी आलो. पुरेशी वातावरणनिर्मितीही झाली. तर झालं असं, आणि हा कळीचा मुद्दा हा, की त्या रात्री, अचानक मला त्या चढावावर एक माणूस दिसला. इतका अचानक की मी जागीच थबकलो. माझ्या हातावरचे केस ताठ उभे राहिले. ते खालीच येईनात, कारण तो मला ओळखीचाही वाटू लागला. मग मी चारही बाजूंनी फेर्‍या घालून, अंधारात आपले डोळे आपल्याला फसवत तर नाहीयेत याची खात्री करून घेतली. माझी खात्री झाली की हा तर आपल्या ओळखीचा, नात्यातलाच जवळजवळ. हा तर आजच्या काळातला, म्हणजे पोस्ट नायंटीज म्हणतात ना, म्हणजे उदारीकरण वगैरे झालं त्यानंतरच्या काळातला, मराठी प्रायोगिक नाटकाचा लेखक. तर मग मला साहिजकच चौकशी करावीशी वाटली आणि मी त्याच्याजवळ गेलो, त्यातून जे घडलं ते मी आज आपणापुढे मांडणार आहे.

- मकरंद साठे
प्रकाशक: पॉप्युलर

मराठी रंगभूमीच्या तीस रात्री

"मराठी रंगभूमीच्या तीस रात्री" या लवकरच प्रकाशित होणा-या पुस्तकातील प्रत्येक रात्रीचा काही अंश सध्या क्रमाने Facebook.com च्या खालील पानावर प्रसिद्ध होत आहेत. लेखकाच्या अनुमतीने, तो इथेही क्रमश: प्रकाशित करत आहोत.
 
 

ओळख:

आधुनिक मराठी रंगभूमीला साधारणपणे गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षांचा अत्यंत समृद्ध असा इतिहास आहे. या कालखंडात महाराष्ट्रातील -आणि भारतातील - सामाजिक राजकीय वास्तवात जेवढे मूलभूत बदल झाले तेवढे त्याआधीच्या काही हजार वर्षांत झाले नव्हते. मराठी रंगभूमी या बदलांची साक्षी होती आणि आपल्या परीने त्यांचे अर्थ लावत- कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणता- तिने काही सक्रीय भूमिकाही निभावली. 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा अशा रंगभूमीचा विलक्षण इतिहास तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन, एका प्रकारे तो या कालखंडातील सामाजिक वास्तवाचाच मांडलेला एक लेखाजोगा आहे.

या ग्रंथात एक प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. या ग्रंथातील मांडणी, एका विदुषकाने एका नाटककाराला सांगितलेल्या तीस कथा अशा स्वरूपात मुद्दाम करण्यात आली आहे. या मांडणीत इतिहास अभ्यासाच्या शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केलेली नसली, अशा स्वरूपामुळे हा ग्रंथ, या विषयाचा काही खास अभ्यास नसणार्‍या सामान्य वाचकासही एखाद्या कादंबरीप्रमाणे 'सहज' गुंतवून ठेवेल. या ग्रंथाच्या आशयाइतकीच त्याची शैलीही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

लेखकाविषयी -
नाटककार आणि कादंबरीकार म्हणून मकरंद साठे यांनी साहित्यविश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाट्य-लेखनासोबतच नेपथ्यरचना, नाट्यदिग्दर्शन अशा नाट्यक्षेत्राशी जोडलेल्या गोष्टींमध्येही त्यांनी यश मिळवले आहे. 'चारशे कोटी विसरभोळे', 'रोमन साम्राज्याची पडझड', 'सापत्नेकराचे मूल', 'ऐसपैस सोईने बैस', 'ठोंब्या', 'सूर्य पाहिलेला माणूस', 'www.गोळायुग.com', 'चौक' या नाटकांबरोबरच, 'घर' आणि 'वाढदिवस' या दोन एकांकिकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांपैकी सॉक्रेटिसच्या जीवनावरील 'सूर्य पाहिलेला माणूस', माणसाच्या जीवनावरचे भाष्य असलेले 'चौक' ही त्यांची गाजलेली नाटके. 'अच्युत आठवले आणि आठवण' ही त्यांची पहिली प्रकाशित कादंबरी. त्यानंतर 'ऑपरेशन यमू' ही कादंबरी प्रकाशित झाली. या दोन्ही कादंबर्‍या वेगळ्या वाटा निर्माण करणार्‍या ठरल्या.

दोन वर्षांपूर्वी बंगळुरूच्या 'इंडिया फौंडेशन फॉर द आर्टस' या फौंडेशनतर्फे मिळालेल्या अभ्यासवृत्तीचा भाग म्हणून 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा मराठी रंगभूमीचा त्रिखंडात्मक राजकीय सामाजिक इतिहास त्यांनी नुकताच लिहून पूर्ण केला आहे व पॉप्युलरतर्फे तो लवकरच प्रकाशित होत आहे.

 माणसाचे जगणे, त्यातील व्यथांचे सूक्ष्म रेखाटन करणारे सुप्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या तीस चित्रांचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे. प्रत्येक रात्रीच्या गोष्टीशी सुसंगत एक चित्र स्वत: मकरंद साठे यांनीच निवडले आहे. त्यामुळे एकूणच कलाप्रेमी रसिकांसाठी 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' एक मेजवानी ठरणार आहे. 

 १७५० पृष्ठे असलेल्या या ग्रंथातील तीस रात्रींचे एकूण तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात पंधरा रात्री आहेत.